‼️ ४ जुलै ‼️
🚩!! श्रीमत् दासबोध !!🚩
🌹दशक -१७ प्रकृतिपुरुष ,समास -४ अनुमाननिर्शन 🌹
ज्याला कसलीही प्रचीति नाही, अनुभव नाही त्याने अध्यात्माच्या गोष्टी सांगू नयेत. अशा अननुभवी व्यक्तिकडून अनेक घोटाळे होण्याचा संभव असतो असं श्रीसमर्थ या समासात बजावून सांगत आहेत. ज्या शब्दात ते सांगायचे असेल त्याचे नेमके स्वरूप आधी आपण समजून घेणे आवश्यक असते. आधी स्वतःला प्रचीति असल्याशिवाय असला उपद्व्याप करूच नये. नाहीतर कुठल्याही अनुभवाशिवाय निरूपण सांगणारा मग सर्वब्रह्मवाद मांडतो. तो हे सारे बुद्धिच्या भूमिकेवरूनच सांगत असतो, म्हणून त्याने ते मौनगर्भ ब्रह्म अनुमानाच्या कक्षेत आणून सोडावे. ऐकणार्याने सुद्धा स्वतः अनुभव घेऊन मगच अशा लोकांचे म्हणणे ऐकावे. अनुभूतिचे बोल ऐकले तर आत्मसाक्षात्काराची खूण ऐकणाराच्य़ा मनात लगेच बाणते हे ध्यानात ठेवावे.
संकेत कुबडीत प.पू. हंसराज स्वामी म्हणतात, “- - । कर्तयाचें रूप केलें । प्रतीति बिंबऊन जें बोलिलें । तें ऐकीले पाहिजे श्रोतां ॥संकु१७-९॥” अर्थात चौथ्या समासात कर्त्याचे स्वरूप स्पष्ट केले असून जे अनुभूतीच्या आधारे बोलत आहेत ते श्रोत्यांनी लक्षपूर्वक ऐकले पाहिजे.
॥श्रीराम॥ बहुत जनासी उपाये | वक्तयास पुसतां त्रासों नये | बोलतां बोलतां अन्वयें | सांडूं नये ||१||
श्रोत्यानें आशंका घेतली | ते तत्काळ पाहिजे फेडिली | स्वगोष्टीनें स्वगोष्टी पेंचली | ऐसें न व्हावें ||२||
पुढें धरितां मागें पेंचला | मागें धरितां पुढें उडाला | ऐसा सांपडतचि गेला | ठाइं ठाइं ||३||
पोहणारचि गुचक्या खातो | जनास कैसा काढूं पाहातो | आशय लोकांचा राहातो | ठाइं ठाइं ||४||
आपणचि बोलिला संव्हार | आपणचि बोलिजे सर्वसार | दुस्तर मायेचा पार | टाकिला पाहिजे ||५||
जें जें सूक्ष्म नाम घ्यावें | त्याचें रूप बिंबऊन द्यावें | तरीच वक्ता म्हणवावें | विचारवंत ||६||
ब्रह्म कैसें मूळमाया कैसी | अष्टधाप्रकृती शिवशक्ति कैसी | शडगुणेश्वराची स्थिति कैसी | गुणसाम्याची ||७||
अर्धनारीनटेश्वर | प्रकृतिपुरुषाचा विचार | गुणक्षोभिणी तदनंतर | त्रिगुण कैसे ||८||
पूर्वपक्ष कोठून कोठवरी | वाच्यांश लक्ष्यांशाची परी | सूक्ष्म नाना विचार करी | धन्य तो साधु ||९||
अनेक लोकांना तारून नेणारा परमार्थ साधन करत असता समाजातील बहुतांनी त्यासंबंधी विचारलेल्या प्रश्नांचा वक्त्याने त्रास मानता कामा नये. लोकांना उत्तरे देत असता त्याचा मागचा पुढचा संबंध तुटणार नाही अशी काळजी घेत अन्वययुक्त बोलावे. श्रोत्याने घेतलेल्या शंकेचे तेथल्या तेथे समर्पक पण सजगपणे उत्तर द्यावे. स्वतःच्या विधानाने स्वतःच अडचणीत पडण्याचा प्रसंग येऊ नये अशी काळजी घ्यावी. आपल्याच परस्परविरोधी विधानावर श्रोत्यांनी आक्षेप घेतल्यावर असा वक्ता वेळोवेळी आणि ठिकठिकाणी पेचात सांपडतो. म्हणून आपले वक्तृत्व नेहमी अभ्यासप्रचूर आणि सुसंगत असावे. जो स्वतःच गटांगळ्या खातो तो इतर बुडणार्यांना लोकांना कसा वाचवू शकेल? तद्वत विषयाचे नीट आकलन न झाल्याने लोकांच्या मनातील शंका तशाच कायम राहून जातात. एकीकडे सर्व दृश्य नाशवंत म्हणून सांगायचे आणि लगेच सर्व दृश्य ब्रह्मरूप-सार आहे असं म्हणायचं; अशी परस्परविरोधी वाक्ये स्पष्टिकरणाशिवाय आपल्या प्रवचनात वक्त्याने वापरली श्रोत्यांचा मोठाच गोंधळ होतो. या उलट दुस्तर मायेचा पैलपार कसा करावा हे सुलभपणे विवरण करणारं आपलं निरूपण असले पाहिजे.ज्या ज्या सूक्ष्म तत्त्वाचे नाव घ्यावे, त्याचे स्वरूप अगदी स्वच्छपणे समजावून देऊन श्रोत्यांच्या मनावर पक्क ठसवावे. असे केले तरच विचारवंत वक्ता असे म्हणवून घेता येते. परब्रह्म, मूळमाया, अष्टधाप्रकृती व शिवशक्ति, षड्गुणैश्वर, गुणसाम्य, अर्धनारीनटेश्वर, प्रकृतिपुरुष, गुणक्षोभिणी, त्रिगुण ही सर्व तत्त्वे उलगडून स्पष्ट करून सांगावीत. पूर्वपक्ष हा कोठून कोठपर्यंत असतो हे सांगणारा आणि वाच्यांश व लक्ष्यांश याचे सूक्ष्म पदर उलगडून दाखवून ते स्पष्ट करून सांगणारा साधु धन्य होय.
नाना पाल्हाळीं पडेना | बोलिलेंचि बोलावेना | मौन्यगर्भ अनुमाना | आणून सोडी ||१०||
घडी येक विमळब्रह्म | घडी येक म्हणें सर्वब्रह्म | द्रष्टा साक्षी सत्ता ब्रह्म | क्षण येक ||११||
निश्चळ तेंचि जालें चंचळ | चंचळ तेंचि ब्रह्म केवळ | नाना प्रसंगीं *खळखळ | निवाडा नाहीं ||१२||
चळतें आणी निश्चळ | अवघें चैतन्यचि केवळ | रूपें वेगळालीं प्रांजळ | कदापी बोलवेना ||१३||
उगीच करी गथागोवी | तो लोकांस कैसें उगवी | नाना निश्चयें नाना गोवी | पडत जाते ||१४||
भ्रमास म्हणे परब्रह्म | परब्रह्मास ह्मणे भ्रम | ज्ञातेपणाचा संभ्रम | बोलोन दावी ||१५||
घाली शास्त्रांची दडपण | प्रचितिविण निरूपण | पुसों जातां उगाच सीण | अत्यंत मानी ||१६||
ज्ञात्यास आणि पदार्थभिडा | तो काय बोलेल बापुडा | सारासाराचा निवाडा | जाला पाहिजे ||१७||
वैद्य मात्रेची स्तुती करी | मात्रा गुण कांहींच न करी | प्रचितिविण तैसी परी | ज्ञानाची जाली ||१८||
जेथें नाहीं सारासार | तेथें अवघा अंधकार | नाना परीक्षेचा विचार | राहिला तेथें ||१९||
असा चतुर साधु पाल्हाळ न लावता, एकदा बोललेलेच पुन्हा न बोलता मौन्यगर्भ असणारे परब्रह्म श्रोत्यांच्या अनुमानास आणून सोडतो. ते ब्रह्मस्वरूप श्रोत्यांच्या तर्काच्या कक्षेत आणून सोडतो. पण जो वक्ता, एकदा म्हणतो ब्रह्म विमल, नंतर म्हणतो ते सर्वब्रह्म आहे, पुन्हा म्हणतो ते द्रष्टा, साक्षी, सत्तारूप आहे; अशा प्रकारची विसंगत विधाने वेळोवेळी जो वक्ता करतो, त्याला हा विषय नीट कळलेला नसतो, त्याच्याच कल्पना सुस्पष्ट झालेल्या नसतात. एकदा म्हणतो निश्चळ असलेले ब्रह्म चंचळ झाले, पुन्हा म्हणतो चंचळ तेच केवळ ब्रह्मस्वरूप असते; पण अनेक प्रसंगीं त्यास हे स्पष्ट करून सांगता येत नाही, कसलाही निवाडा न होता केवळ त्याच्या मनात गोंधळ माजलेला असतो. “चळतें आणि निश्चळ” हे दोन्ही अवघे केवळ चैतन्यरूपच असेही सांगतो; त्यांची भिन्नस्वरूपे प्रांजळ करून तो सांगू शकत नाही. उगीच सारा गोंधळ करून ठेवतो. तो विचक्षण व जिज्ञासू लोकांचे समाधान कसे शकेल बरे? उलट वेळोवेळी संभ्रमाचा गुंता मात्र वाढतच जातो. भ्रमरूप जगतास परब्रह्म म्हणतो, स्वसंवेद्य परब्रह्मास भ्रम ठरवतो. आपणच ज्ञानी आहोत अशा संभ्रमात तो स्वतः बोलत राहतो. श्रोत्यांवर शास्त्रवचनांचा मारा करून अनुभवाशिवाय निरूपण करतो, कोणी प्रश्न विचारलेच तर त्याला त्या प्रश्नांचा मोठा शीण वाटतो. दृश्य पदार्थांची अपेक्षा धरून, बिदागीच्या मोहाने हा ज्ञाता बिचारा काय बरे स्पष्ट बोलणार? खरं तर आपल्या बोलण्यात वक्त्याने सारासाराचा निवाडा निर्भिडपणाने मांडला पाहिजे. वैद्याने आपल्या औषधी मात्रेची स्तुती करावी आणि त्याने गुण मात्र कांहीच न यावा. अशावेळी त्याने केलेली स्तुती निरर्थकच ठरत असते. त्याप्रमाणे प्रचीतिशिवाय केलेल्या आत्मज्ञानाच्या निरूपणाची अवस्था होत असते. जेथे सारासार विचार नसतो, तेथे सारा अंधारच असतो. विविध प्रकारे तपासून व परीक्षा घेऊन आपले ज्ञान अद्यावत करण्याचा विचार काही अशा माणसाला सुचत नाही.
पाप पुण्य स्वर्ग नर्क | विवेक आणि अविवेक | सर्वब्रह्मीं काये येक | सांपडलें नाहीं ||२०||
पावन आणि तें पतन | दोनी मानिलीं तत्समान | निश्चये आणि अनुमान | ब्रह्मरूप ||२१||
ब्रह्मरूप जालें आघवें | तेथें काय निवडावें | अवघी साकरचि टाकावें | काये कोठें ||२२||
तैसें सार आणि असार | अवघा जाला येकंकार | तेथें बळावला अविचार | विचार कैंचा ||२३||
वंद्य निंद्य येक जालें | तेथें काये हाता आलें | उन्मत्त द्रव्यें जें भुललें | तें भलतेंच बोले ||२४||
तैसा अज्ञानभ्रमें भुलला | सर्व ब्रह्म म्हणोन बैसला | माहापापी आणि भला | येकचि मानी ||२५||
सर्वसंगपरित्याग | अव्हासवा विषयेभोग | दोघे येकचि मानितां मग | काये उरलें ||२६||
भेद ईश्वर करून गेला | त्याच्या बाचेन न वचे मोडिला | मुखामधें घांस घातला | तो अपानीं घालावा ||२७||
’सर्व-ब्रह्म’वादाच्या शाब्दिक गदारोळात पाप-पुण्य, स्वर्ग-नर्क, विवेक-अविवेक या परस्पर विरोधी जोड्याना काहीही स्थान न उरता सगळंच ब्रह्मरुप असं तो सांगत सुटतो. मग पतित आणि पावन; निश्चय आणि अनुमान ह्या जोड्याही ब्रह्मरूप ठरतात. याप्रमाणे सगळं काही ब्रह्मस्वरूप झाल्यावर तेथे सारासार निवडायला वावच उरत नाही. सर्वत्र साखरच असेल तर त्यातून वेगळी साखर बाजूला कशी काढावी? त्याप्रमाणे सार आणि असार हा भेद नाहीसा होऊन अवघा एकंकार झाला तर तेथे विचार न उरता अविचारच बळावतो, त्याचच प्राबल्य होते. जेथे वंद्य आणि निंद्य यामधील भेदच नाहीसा होतो; तेथे काहीच हाती लागत नाही. उन्मत्त-अंमली द्रव्य प्राशन करून माणूस त्या नशेत जसा बरळतो, तसे हे सर्वब्रह्मवादी भलतेच बरळत असतात. त्याचप्रमाणे अज्ञानभ्रमामुळे जो भुललेला असतो, तोच सर्व ब्रह्म आहे असं म्हणत बसतो. महापापी आणि पुण्यावान सज्जन,भल्या माणसांना तो एकाच मापाने मोजतो. सर्वसंगपरित्याग ही प्रखर वैराग्याची अवस्था आणि अव्हाच्यासवा असा बंधनरहित विषयोपभोग या दोन्ही अवस्था एकच मानल्यावर पुढे बोलायाला काय उरले सांगा ना? वास्तविक पाहतां जगात निसर्गदेवानेच भेद करून ठेवलेला आहे. इंद्रियभेद, लिंगभेद, विषयभेद इत्यादि सारे भेद निसर्गदेवनिर्मित आहेत. असा हा भेद सर्वब्रह्म सांगणार्याच्या बापालाही मिटवता येणारा नाही. त्याने मुखात घांस घालण्याऐवजी अपानी घालून दाखवावा.
ज्या इंद्रियास जो भोग | तो तो करी येथासांग | ईश्वराचें केलें जग | मोडितां उरेना ||२८||
अवघी भ्रांतीची भुटाटकी | प्रचितिविण गोष्टी लटकी | वेड लागलें जे बटकी | ते भलतेंचि बोले ||२९||
प्रत्ययज्ञाता सावधान | त्याचें ऐकावें निरूपण | आत्मसाक्षात्काराची खूण | तत्काळ बाणें ||३०||
वेडें वांकडे जाणावें | आंधळें पाउलीं वोळखावें | बाश्कळ बोलणें सांडावें | वमक जैसें ||३१||
ज्या इंद्रियांचा जो भोग निसर्गाने नेमला आहे तो भोग ते इंद्रिय यथासांग घेऊ शकते. निसर्गदेवतेने जगाची केलेली रचना मोडता येत नाही. सर्वब्रह्मवाद्यांचे बोलणे, जगात मुळीच भेद नाही असं म्हणत तसेच वागणे ही अवघी भ्रांतीची भुताटकी होय. त्याचे बोलणे म्हणजे भ्रांत बाधिताने प्रचीतिशिवाय केलेली लटकी गोष्ट होय. एखाद्या दासी-बटकीला वेड लागल्यावर ती जशी भलतेच बरळत असते, तसे हे सर्वब्रह्मवाद्याचे हे बरळणेच असते. जो स्वतः प्रत्ययज्ञाता असतो, आत्मज्ञानी असून सावधान असतो त्याचेच निरुपण ऐकावे. अशा आत्माज्ञानी माणसाचे निरुपण ऐकल्यावर आत्मसाक्षात्काराची खूण तत्काळ अंतःकरणात बाणते. जे वेडेवांकडे असते ते बरोबर ध्यानात येत असते, जर कोणी आंधळा माणूस असेल तर त्याच्या चालण्यावरूनच ते ओखळता येते. तद्वत सर्वब्रह्मवाद्यांसारखे वेडेवांकडे सांगणारा ज्ञानी आहे किंवा नाही, स्वानुभवी आहे किंवा नाही, हे त्याच्या प्रत्यक्ष वागण्यावरून ओळखावे. सर्वब्रह्मवाद्याचे वाह्यात-बाष्कळ बोलणे एखाद्या ओकारीप्रमाणे टाकून द्यावे.
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे अनुमाननिर्शन-२ नाम समास चवथा || १७.४ || जयजयरघुवीर समर्थ ! इदं न मम !
🛕अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🛕
‼️जय जय रघुवीर समर्थ ‼️
No comments:
Post a Comment