Friday, 22 September 2023

कावळ्याची गोष्ट -संजय सोपारकर

ही पोस्ट खरे तर कावळ्याला समर्पित आहे.. मी माझ्या जुन्या फ्लॅट मध्ये मी कावळ्याला नेहमी जेवण आणि पाणी ठेवत होतो..हा क्रम १५ वर्षापासून चालू आहे.....या कावळ्याची एक फॅमिली होती .कावळा त्याची बायको आणि २ पिल्ले... त्या कावळे कुटुंबाला आता माझ्या घरी येऊन जेवण्याची सवय लागली..ते माझ्या खिडकीच्या समोरच्या झाडावर येऊन माझ्या खिडकी वर जसे काय लक्ष च ठेवू लागले..आम्ही सुध्धा आमच्या घरात नवीन काय पदार्थ केला तर आधी कावळ्याला देत होतो..त्याला पदार्थ करतानाचा सुगंध आला की लगेच तिथे २/३ कावळे हजर होत असत.मात्र फक्त एक दोन वेळेसच कावकाव करत असतं.जसे काय त्यांना माहीत होते पदार्थ तयार झाल्यावर आधी त्यांच्याच ताटलीत पडणार .फक्त ओरडुन इशारा देत असत की आम्ही वाट बघत आहोत.अगदी हक्काने मागत असत..

पुढे फ्लॅट बदलण्याची वेळ आली .शेवटचे काही दिवस आमचे सामान नेताना बघून कावळा पण थोडा अस्वस्थ झाला होता. आणि कावळा कुटुंब पण तिथे येऊन खायला मागेनासा झाले जणू त्यांस वास्तव कळले होते.आम्ही तिथे पक्षांसाठी पाणी प्यायला पण ठेवत होतो. शेवटच्या दिवशी आम्ही आमचे शेवटचे सामान नेले तेव्हा ती ४ कावळ्यांची फॅमिली समोर झाडावर बसून आमच्याकडे नुसती बघत होती..दुपारची त्यांची ती जेवणाची वेळच होती .दुपारी  २ वाजले होते...पण मी दिलेले त्यांनी काहीही खाल्ले नाही जसे काय त्यांना खाण्यात काहीही इंटरेस्ट नव्हता.....फक्त तिथे आम्ही एक पाण्याची जागा करून ठेवली होती म्हणजे एक पाण्याची थाळी होती त्यात आता पाणी नव्हते तेव्हा एक कावळा तिथे येऊन बसला आणि टोच मारून दाखवू लागला की आम्हाला पाणी द्या..त्यावेळी उन्हाळ्याची रखरख चालू होती..मी त्यात पाणी ओतले तर माझ्याकडे बघत बघत पाणी फक्त प्याला आणि उडून झाडावर जाऊन बसला..तो कावळा जवळ येऊन पाणी पिताना माझ्याकडे असा बघत होता की त्याच्या डोळ्यातील दुःखाचे भाव वाचता येत होते .मला पण त्यावेळी खुप भरून आले  आणि जुने दिवस आठवले..यातील एक वडील कावळा होता तो माझ्या हातून गाठे खात असे. खिडकीत टाकलेले  फरसाण तो खात नसे.. आता हे नवीन कावळे होते ती त्याचीच पोरे होती..याच्या सोबत साळुंकी..बुलबुल..पोपट..चिमण्या या पण येत असत आणि मग त्यांची मध्येच भांडणे होऊन गोड कलकलाट होत असे..

  कावळा हा अतिशय बुद्धिमान पक्षी म्हणून प्रसिध्द आहे..हे कावळे माणसाचे चेहरे ओळखतात..जेव्हा कावळा एखाद्या व्यक्तीचा चेहरा पाहतो तेव्हा  चेहरा त्याच्या दीर्घकाळ स्मरणात राहतो...कावळ्यावर जो कोणी हल्ला किंवा उपकार करतो त्या व्यक्तीचा चेहरा कावळे कधीच विसरत नाही आणि आपल्या जोडीदार यानाही याबाबत ते माहिती देत असतात.

तसेच त्यांस सात आकडे पर्यंत मोजता येतात म्हणजे सात माणसे वगैरे असे त्यांना चक्क मोजता येते असे सांगितले जाते..

आता नवीन फ्लॅट मधला कावळा जो खायला येतो तो तर असा शिष्ट मिळाला आहे की . त्याला हात जोडल्या शिवाय खायला येत नाही त्याची हात जोडून विनंती करावी लागते तर लगेच येतो नाहीतर ढुंकून पण बघत नाही..मच्छी असली तरी येत नाही
हात जोडले तर भाजी खायला पण लगेच येतो..( यावर तुमचा विश्वास बसणार नाही हे मला माहीत आहे .)

खूप वेळा पिंड दान केल्यावर कावळा येत नाही ..जरी आला तरी चोच मारत नाही मग लोक सर्व इच्छापूर्ती संबंधी बोलून दाखवतात...तरीही तो चोच लावत नाही...मग दर्भाचा कावळा करून पिंडाला स्पर्श केला जातो ..यावर एक उपाय सांगतो..पटला तर बघा नाहीतर सोडुन द्या .खूप वेळेला असे होते की जो आत्मा आहे त्याच्या इच्छा फारसा नसतात पण त्याला चांगली गती हवी असते म्हणून त्याला पुण्य अंश ची गरज असते..मग अशा वेळी घरातील कोणी त्याला वचन द्यावे की अमुक दिवस शिव जप / शिवलीला अमृत / वगैरे जप करेन तुमच्या नावाने संकल्प धरून व त्याचे पुण्य तुम्हाला प्रदान करेन...किंवा काही अनाथ आश्रम..अंध शाळा...यांना देणगी देईन..गरीब विद्यार्थी ची फी भरेन..असे काही संकल्प करावेत..याने पिंडाला कावळा शिवतो...मग तसे झाल्यावर वचन दिल्याप्रमाणे विधी करावेत..हा एक पर्यायी उपाय आहे..मी काही लोकांना सुचवला होता..मी मुद्दाम फीडबॅक पण घेतला.सकारात्मक आला ..म्हणून.मी.ही पोस्ट टाकत आहे..यावर वाद होतील ते मला माहित आहे..पण आपल्या मुळे लोकांचे भले होत असेल तर काय वाईट आहे असा विचार माझ्या मनात आला..बाकी लोक दहीभात कावळ्याला दाखवत असतात त्याने कावळा लगेच येतो..असे ही असते .त्याला दहीभात आवडत असावा .किंवा ही मग लालुच झाली .त्या पेक्षा वरील मी दिलेला उपाय केला तर समाजातील अन्य घटकांचे ही भले होईल..बाकी अन्य कथा नुसार कावळा हा शनी महाराज वाहन म्हटले जाते..अन्य कथे नुसार एकदा त्रेता युगात एक यज्ञ चालू होता तेव्हा सर्व देव आहुती घेण्यासाठी यज्ञ मंडपात आले होते.त्याच वेळी रावण त्या मंडपात घुसला..ते बघून सर्व देवांनी त्या वेळी प्रचलित असलेल्या प्राणी पक्षाची रूपे धारण केली .नंतर रावण गेल्यावर सर्व देव मूळ रूपात आले .मात्र त्यावेळी देवांनी सर्व पक्षांना आपल्यातील एक गुण प्रदान केला .इंद्राने मयूर रूप घेतले म्हणून इंद्र सहस्त्र अक्ष म्हणून मोर पिस वर डोळे.. वगैरे.. यमाने कावळा स्वरूप घेतले होते म्हणून यमाने कावळ्याला वरदान दिला की तू खाल्लेले पितृ देवांना पोचेल.....ॐ सूर्यपुत्राय विद्महे,महाकालाय धीमहि।तन्नो यम: प्रचोदयात्।।......

पितर साठी दान करताना संकल्प मंत्र देत आहे तो पठण करून दान द्यावे..म्हणजे ते अधिक शास्त्र शुद्घ होऊन जाईल.

 विष्णुर्विष्णुर्विष्णु नम: परमात्मने पुरुषोत्तमाय ॐ तत्सत् अद्य ब्रह्मणो द्वितीय परार्धे श्री श्वेत वराह कल्पे वैवस्वत मन्वन्तरे अष्टाविंशतितमे कलियुगे कल‍ि प्रथम चरणे जम्बुद्वीपे भारतवर्षे भरत खण्डे... क्षेत्रे... पराभव नाम संवत्सरे उत्तरायणे/ दक्षिणायने,---- ऋतौ, --- मासे, ---पक्षे, ---तिथौ (तिथि),---वासरे (जो वार असेल तो ) ---गौत्र: ....गौतम..विश्वामित्र..जे काय असेल ते..अहं। शास्त्रोक्त फल प्राप्ति द्वारा मम समस्त पितृ शान्त्यर्थे श्री परमेश्वर प्रीत्यर्थं... दान (या गौ/ भूमि इत्यादि जे काय तुमचे दान असेल ते..) निष्क्रय द्रव्यं चाहं करिष्ये।' ॐ तत्सत्।

इथे गोत्र हे महत्त्वाचे असते..भारतीय संस्कृती मध्ये गोत्र हे अत्यंत प्राचीन काळापासून चालत आलेले आहे .. गोत्र ही कल्पना पश्चिमी देशात टोळी वरून केली जाते तसे भारतात अजिबात नाही हे इथे मी मुद्दाम सांगतो...

भारतात  गोत्र हे प्राचीन ऋषी मुनी पासून तयार झाले आहे..मूळ ऋषी समजा गौतम आहे तर त्याच्या पासून निर्माण झालेली पिढी..मग त्यात मोठी पाती धाकटी पाती असे प्रकार निर्माण झाले..मग समजा धाकटी पाती हीचा मुख्य ऋषी शांडिल्य असेल तर त्याचे शांडिल्य गोत्र असे हे काही लोक मानू लागले..मोठी पाती समजा अन्य कोणी ऋषी तर मग त्याचे वंशज हे त्या ऋषिला मूळ गोत्र मानू लागले.
काही लोकांस आपले गोत्र माहीत नसते तर त्यांनी सरळ कश्यप गोत्र उच्चारण करावे..कारण कश्यप ऋषी हे मूळ पुरुष मानले जातात . त्यांच्या इतर संतती पासून इतर गोत्र उत्पन्न झाली..

दक्ष कन्या मधल्या १३ कन्या सोबत कश्यप ऋषी यांचा विवाह झाला..त्यांची नावे..
अदिति, दिति, दनु, काष्ठा, अरिष्टा, सुरसा, इला, मुनि, क्रोधवशा, ताम्रा, सुरभि, सुरसा, तिमि, विनता, कद्रू, पतांगी और यामिनी ..त्यापासून पुढची प्रजा निर्माण झाली...

बौधायन सूत्रानुसार विश्वामित्र, जमदग्नी, भारद्वाज, गौतम, अत्रि, वसिष्ठ, कश्यप आणि अगस्त्य या ८ ऋषींपासून ८ प्राथमिक गोत्रे तयार होतात..म्हणजे या आठ ऋषींची नावे ही काही वेळा गोत्र संस्थापक म्हणून घेतली जातात..

धर्मसिंधु” ग्रंथामध्ये गोत्राचे लक्षण पुढील प्रमाणे दिले आहे,

‘तत्र गोत्र लक्षणम् – विश्वामित्रो जमदग्निर भारद्वाजोsथ गौतमः | अत्रिर्वसिष्ठः कश्यप इत्येते सप्तऋष्यः ||’

अर्थात, विश्वामित्र, जमदग्नि, भरद्वाज, गौतम, अत्रि, वसिष्ठ, आणि कश्यप हे सात ऋषी आहेत. व आठवे ऋषी अगस्त्य हे होत. यापैकी प्रत्येक ऋषीचे आपत्य म्हणजे गोत्र होय. गोत्रांची संख्या अगणीत असली तरी धर्माने त्यांची व्यवस्था सुलभ व्हावी म्हणून त्यांची विभागणी पन्नास गणामध्ये केलेली आहे. त्या त्या ऋषींच्या नावांना गोत्र असे म्हणतात.

गोत्रांचे पुढीलप्रमाणे वर्गीकरण करण्यात आले आहे. आश्वलायन-श्रौतसूत्रानुसार वसिष्ठ गणामध्ये चार उपविभाग आहेत: उपमन्यू, पराशर, कुंदिन आणि वसिष्ठ(पहिल्या तीनमध्ये नसलेले). या चारांमध्ये पुन्हा उप-उपविभाग आहेत. ज्यांना गोत्र असे म्हणातात. म्हणजे वर्गीकरण प्रथम गणांत, नंतर पक्षांत व नंतर गोत्रांत होते. आजही भृगू आणि अंगिरस गण अस्तित्वात आहेत. बौधायनानुसार मुख्य ८ गोत्रांचे पक्षांमध्ये विभाजन करण्यात आले आहे. उपमन्यूंची प्रवरे वसिष्ठ, भारद्वसू व इंद्रप्रमाद; पराशर गोत्रातील प्रवरे वसिष्ठ, शाक्त्य व पाराशर्य; कुंदिना गोत्राची वसिष्ठ, मैत्रात्रवरुण व कौंडिण्य ही होत..

गोत्रांची संख्या अगणीत असली तरी आपल्यासाठी त्यांची व्यवस्था सुलभ व्हावी म्हणून त्यांची विभागणी पन्नास गणामध्ये केलेली आहे. प्रत्येक गोत्रांना प्रर्वतक ऋषी असतात. काही गोत्रांना एक, काही गोत्रांना दोन, काही गोत्रांना तिन ते पाच पर्यंत प्रवर्तक असतात. या प्रवर्तक ऋषी गणांना प्रवर असे म्हणतात. काही समाजामध्ये आजही सप्रवर विवाह वर्ज केला जातो. 

पूर्वी आडनावे नव्हती त्यावेळी हे गोत्र आणि प्रवर वरून व्यक्तीची ओळख पटवली जात असे..म्हणजे अगस्त्य कुळ उत्पन्न  प्रवर अमुक अशी ओळख पटवली जात असे...त्यावरून इतर ओळखी निघत असत..ही गोत्र उच्चारण वैदिक संस्कृती मध्ये १६ संस्कार मध्ये घेतली जात असत..त्यामुळे सर्वांना आपापली गोत्र प्रवर बिनचूक पाठ असतं . 

हिंदू धर्मातील सोळा संस्कार (षोडश संस्कार) खालिलप्रमाणे आहेत :

गर्भाधान......पुंसवन ....अनवलोभन......सीमंतोन्नयन...
जातकर्म.......नामकरण......सूर्यावलोकन.....निष्क्रम.......अन्नप्राशन......वर्धापन.....चूडाकर्म.....अक्षरारंभ.......उपनयन....समावर्तन.....विवाह. ..अंत्येष्टी
यातील प्रत्येक विधी सुरू करताना गोत्र प्रवर उच्चारण केले जात असे...काळाच्या ओघात यातील ३/४ संस्कार आता शेष राहिले आहेत. 

हा विषय भरपूर किचकट आहे त्यामुळे छोट्या पोस्ट मध्ये याचे विवरण केले जाऊ शकत नाही.. आज इथे एवढी माहिती पुरे झाली..

आदेश.  

सर्व हक्क लेखकाच्या स्वाधीन आहेत..नावाशिवाय लेख फिरवल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.  

लेखक संजय सोपारकर

No comments:

Post a Comment