Wednesday 13 December 2023

भक्तीयोग

विवेचन सारांश
ज्ञान, कर्म, भक्तीयोग आणि परमात्म्याची प्राप्ती 

पारंपारिक पद्धतीने प्रार्थना आणि दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. माता सरस्वती, ज्ञानेश्वर माऊली, भगवान वेदव्यास तसेच सद्गुरु गोविंद देवगिरीजी महाराजांना वंदन करून विवेचनास सुरुवात झाली. रथसप्तमीच्या पवित्र दिवसाच्या सर्वांना शुभेच्छा देण्यात आल्या. ज्याप्रमाणे आज पासून सूर्याचे तेज हळूहळू वाढत जाते त्याप्रमाणे आमच्या अंतरंगात आणि बुद्धीत ज्ञानाचे तेज आणि ज्ञानाची लालसा सदैव वाढू देत अशी प्रार्थना करण्यात आली. विज्ञान हे नेहमी प्रवाही असले पाहिजे. त्यात साचलेपण नसावे. म्हणूनच परमपूज्य सद्गुरुंकडून जे ज्ञान मिळते ते ज्ञान जर स्वतः जवळच ठेवले तर तो स्वार्थीपणा होईल. ते ज्ञान सर्वांना वाटणे हेच शिष्याचे कर्तव्य ठरते. ज्ञानेश्वर माउलींना परमप्रिय असलेल्या नवव्या अध्यायाच्या विवेचनाच्या उत्तरार्धाकडे आता वळूयात. अतिशय गुह्य असे ज्ञान या अध्यायात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला देत आहेत. विशेषतः या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकांमध्ये जे ज्ञान सांगितले आहे ते गीतेमध्ये इतरत्र कोठेही आले नाही. ही ज्ञानाची धारा जी भगवान श्रीकृष्णांपासून सुरू झालेली आहे ती आजही तितकीच प्रभावी आहे. ज्ञानधारा भक्ती प्रवाहित करते, आपले अंतःकरण शुद्ध करते.  

या जीवन संघर्षात जे शाश्वत ज्ञानाकडे आपले लक्ष केंद्रित करू इच्छितात त्या सर्वांसाठी ज्ञानेश्वर महाराज सांगतात - 
अहो अर्जुनाचिये पांती | जे परिसणया योग्य होती।
तिहीं कृपा करून संतीं | अवधान द्यावे ॥ १.६२॥
अहो अर्जुनाच्या पंक्तीला बसण्याची योग्यता असलेले आणि त्या पंक्तीत बसून हे गीता आख्यान ऐकण्याची योग्यता असलेले असे हे संत श्रोते समोर बसले आहेत त्यांनी कृपा करून अवधान द्यावे ।।१.६२।।

अशा या गीतेच्या मध्यभागी स्थित असलेल्या सुंदर नव्या अध्यायाच्या उत्तरार्धाला आपण सुरुवात करूया.
या अध्यायाच्या सुरुवातीला आपण जीव, जगत आणि जगदीश्वर यांचा परस्पर संबंध पाहिला. परमात्म्याच्या अध्यक्षतेखाली प्रकृती कशी कार्य करते हेही आपण पाहिले. परमात्म्याला न जाणणारे तसेच जाणूनही न मानणारे असे लोक व्यर्थ जीवन जगतात आणि या सृष्टीसाठी ते कोणतेही महत्त्वपूर्ण कार्य करत नाहीत. त्यानंतर भगवंत दैवी संपत्तीने युक्त अशा महात्म्यांचे वर्णन करतात. परमेश्वराशी एकाकार होणारे, अनन्य भावाने त्याची भक्ती करणारे, सृष्टीचे कल्याण करण्यासाठी कर्म करणारे आणि या सृष्टीच्या हितासाठी आपल्या जीवनाची काहीतरी आहुती देणारे या सृष्टीत असतात आणि त्यामुळेच सृष्टीची उन्नती होत असते. 



9.22

अनन्याश्चिन्तयन्तो मां(य्ँ), ये जनाः(फ्) पर्युपासते।
तेषां(न्) नित्याभियुक्तानां(य्ँ), योगक्षेमं(व्ँ) वहाम्यहम्॥9.22॥

जे अनन्य प्रेमी भक्त मज परमेश्वराला निरंतर चिंतन करीत निष्काम भावनेने भजतात, त्या नित्य माझे चिंतन करणार्‍या माणसांचा योगक्षेम मी स्वतः त्यांना प्राप्त करून देतो.

इथे भगवंत पहिल्या चरणात म्हणतात, "जे अनन्य भावाने माझी भक्ती करतात." येथे एक लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे 'माझी' या शब्दाचा अर्थ लौकिक अर्थाने न घेता 'परब्रह्म परमात्म्याची' असा घ्यावा. येथे भगवान सर्वसामान्य जनतेसाठी ही ज्ञानधारा प्रवाहित करत आहेत. परंतु ते परमात्मा स्वरूप आहेत. त्यामुळे त्यांना आकारात सीमित करता येणार नाही. 

तसेच दुसरी लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे 'अनन्य' हा शब्द. अनन्य याचा अर्थ न अन्य म्हणजे केवळ श्रीराम, श्रीकृष्ण, अल्ला असा नसून एकच परमात्मा विविध रूपात सर्व सृष्टीचे नियंत्रण करत आहे. ज्ञानधारा जिथून प्रवाहित झालेली आहे त्या ठिकाणाहून इतरही अनेक ज्ञानधारा प्रवाहित होत असतात.‌ परंतु केवळ मी मानतो तेच परमात्म्याचे स्वरूप आहे असे मानणे ठीक नाही. यामुळे सांप्रदायिकता वाढते. अनन्य या शब्दाचा चुकीचा अर्थ घेतल्यामुळे अशी भावना वाढते की केवळ माझाच परमात्मा बरोबर आहे, माझीच उपासना बरोबर आहे आणि इतरांनी केवळ त्याच मार्गाचा अवलंब केला पाहिजे. या भावनेने या जगात युद्धेही होतात. शिव, विष्णु, जगदंबा इत्यादींपैकी जे रूप आपल्याला भावेल त्या रूपात आपण परमात्म्याची उपासना करू शकतो. परंतु भगवंताची सर्व रूपे ही एकाच परमात्म्याची स्वरूपे आहेत. त्या इतर स्वरूपांचाही आपण आदर केला पाहिजे. आपण सर्वांनी 'विंग्स ऑफ फायर' हे पुस्तक वाचले असेल. आपले आदरणीय राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी ते लिहिले आहे. ते रामेश्वर येथे राहायचे. त्यांचे वडील तेथील मशिदीचे मुख्य मौलवी होते. तेथे शाळेत त्यांचा मित्र लक्ष्मण हा रामेश्वर मंदिरातील मुख्य पुजाऱ्यांचा मुलगा होता. या पुस्तकात त्यांनी लिहिले आहे की मशिदीत होत असलेली बांग आणि रामेश्वर मंदिरातील आरतीच्या वेळी वाजणाऱ्या घंटा या एकाच परमात्म्याला आळविण्यासाठी आहेत याबद्दल त्यांच्या मनात किंचितही शंका नव्हती. तसेच ही गोष्ट दोघांचेही वडील आपापल्या मुलांना सांगत असत. 

या श्लोकात पुढे भगवान एक अभिवचन देतात. येथे भगवंतांनी नित्य अभियुक्त अशा सुंदर शब्दाचा उपयोग केला आहे. युक्त याचा अर्थ आहे चिकटलेला आणि अभियुक्त या शब्दाचा अर्थ आहे चारही दिशांनी, बाजूंनी चिकटलेला. त्यामुळे नित्य अभियुक्त याचा अर्थ होतो "जो सतत चारही बाजूंनी परमात्म्याला चिकटलेला किंवा लिप्त आहे असा." याचे वर्णन करताना स्वामीजींनी फार सुंदर दृष्टांत दिला आहे. ज्याप्रमाणे समुद्रातील लाट ही समुद्राला सर्व बाजूंनी चिकटलेली असते त्याप्रमाणे हा नित्य अभियुक्त भक्त असतो असे स्वामीजी म्हणतात. भगवंत पुढे म्हणतात अशा भक्ताचा योगक्षेम मी चालवतो. आपण भगवंताची भक्ती कधी कधी करतो. तसेच ती करत असतानाही बऱ्याच वेळा भोगांसाठी आणि कामनापूर्तीसाठी करतो. ज्याप्रमाणे एखादा मुलगा त्याची अडचण सोडवण्यासाठी इतरत्र मदतीसाठी धावला आणि नंतर त्याच्या पित्याकडे गेला तर तो पिता निश्चितच "तू आधीच माझ्याकडे का आला नाहीस" असे बोलून दाखवेल. तसेच आपणही आपल्या अडचणी सोडवण्यासाठी आपल्या परमात्मारूपी पित्याकडे प्रथम गेले पाहिजे. प्रापंचिक माणसासाठी ते योग्यही आहे. परंतु येथे भगवान अशा व्यक्तींबद्दल न बोलता जो नित्य अभियुक्त भक्त असतो अशा भक्ताबद्दल बोलत आहेत. असे भक्त परमात्म्याशी अभिन्न राहून आणि त्याच्या प्राप्तीसाठी भगवंताची भक्ती करतात.

रामकृष्ण परमहंस असेच काली मातेशी एकरूप झाले होते. जेव्हा त्यांना कॅन्सर झाला तेव्हा ते मिठाई खाऊ शकत नव्हते. त्यामुळे त्यांचे शिष्य स्वामी विवेकानंद यांना फार दुःख व्हायचे. एकदा ते ठाकुरजींना म्हणाले आपण आपली एकाग्रता आपल्या गळ्याशी केंद्रित का करत नाही? आपले दुखणे आपणच बरे करू शकाल. यावर रामकृष्ण म्हणाले, "अरे वेड्या माझे मन जगदंबेच्या चरणी पूर्णपणे एकाग्र झाले आहे. माझ्या मनात इतर कुठलेही विचार येत नाहीत. मन जगदंबेच्या चरणापासून हटवून या नश्वर देहाचे- गळ्याचे -चित्र त्या मनात मी कसे चिकटवू शकतो? असे होऊ शकत नाही." याला अनन्य भक्ती म्हणतात. स्वामी विवेकानंदही असेच होते. सर्व संत महात्मे असेच असतात. त्यांच्यावर कितीही संकटे आली तरी ते परमेश्वराशी असलेले अनुसंधान सोडत नाहीत. स्वामी विवेकानंदांवरही अनेक संकटे आली. त्यांच्या वडिलांचे देहावसान झाले. स्वामी विवेकानंदांचे वडील फार उदार होते. त्यामुळे त्यांच्या निधनानंतर खूप मोठे कर्ज झाले. घराचाही लिलाव झाला. तेव्हा स्वामी विवेकानंद रामकृष्णांकडे आले आणि त्यांना म्हणाले की तुम्ही कालीमातेची प्रार्थना करा आणि माझ्या उपजीविकेची व्यवस्था करावयास सांगा. तेव्हा रामकृष्ण परमहंस म्हणाले, "मी तर जगदंबेपाशी अशा कुठल्याही भौतिक गोष्टी मागत नाही. तूच जगदंबेपाशी जाऊन का मागत नाहीस? तू तर सगुण भक्तीच्या विरोधात आहेस. पण ठीक आहे आज मंगळवार आहे तू देवीच्या गाभाऱ्यात जा आणि देवीपाशी तुला जे मागायचे ते मागून घे." स्वामी विवेकानंद कालीमातेच्या गाभाऱ्यात गेले. साक्षात कालीमातेने त्यांना दर्शन दिले. काली मातेच्या तेजाने विवेकानंद प्रभावित झाले. ते काली मातेला म्हणाले, "आई मला भक्ती दे, ज्ञान दे, वैराग्य दे!" बाहेर आल्यावर रामकृष्णांनी विचारले की जे मागायचे ते मागितलेस का? विवेकानंदांनी "नाही" असे उत्तर दिल्यानंतर ठाकुरजींनी त्यांना पुन्हा गाभाऱ्यात पाठवले. परंतु विवेकानंद कालीमातेला भौतिक गोष्टी मागू शकले नाही. असे तीन ते चार वेळा झाले. ते कालीमातेपाशी भक्ती, ज्ञान आणि वैराग्य एवढेच मागू शकले. ही अनन्य भक्ती होय. 

परमात्म्याकडे नश्वर गोष्टी मागण्यापेक्षा शाश्वत गोष्टी मागण्याची ज्यांची वृत्ती असते अशा भक्तांचा योगक्षेम भगवंत चालवतात.
योग म्हणजे जोडणे. आपल्याकडे जी गोष्ट नाही ती गोष्ट प्राप्त करणे म्हणजे योग आणि ह्या प्राप्त झालेल्या गोष्टीचे संरक्षण म्हणजे क्षेम. आपले संपूर्ण आयुष्य या दोन गोष्टीतच खर्च होते, प्राप्त न झालेल्या गोष्टी मिळवणे आणि त्या प्राप्त झाल्यानंतर त्याचे संरक्षण करणे. येथे भगवंत म्हणतात जे लौकिक गोष्टी विसरले आहेत अशा अनन्य भक्तांचा योगक्षेम मी चालवतो. 

योगक्षेम या शब्दाची व्याख्या अशी करतात
अप्राप्तस्य प्राप्तिः योगः, प्राप्तस्य परिरक्षणं क्षेमः। 
अप्राप्य गोष्टी प्राप्त करणे म्हणजे योग आणि प्राप्त झालेल्या गोष्टींचे रक्षण करणे म्हणजे क्षेम. 
भक्ताला आवश्यक असणाऱ्या गोष्टी देणे आणि त्यांचे रक्षण करणे हे भगवंत करतात. या संपूर्ण सृष्टीचे पालन पोषण भगवंत करतात. मातेच्या गर्भात असलेल्या गर्भाला अन्न पुरवण्याची व्यवस्था सुद्धा भगवंतच करतात. जेव्हा तो जीव गर्भाच्या बाहेर येतो तेव्हा त्याच्या क्षुधापूर्तीसाठी भगवंत मातेच्या स्तनात दूध निर्माण करतात.

ज्ञानेश्वर महाराजांची एक सुंदर ओवी आहे
आपुली तहान भूक नेणें । तान्हया निकें तें माउलीसीचि करणें ।
तैसें अनुसरले जे मज प्राणें । तयांचें सर्व मी करीं ॥ ९-३४० ॥
आपली तहान भूक काही न जाणणाऱ्या लहान मुलाला जे हितकर असेल ते आईलाच करणे भाग पडते, त्या मुलाप्रमाणे जे मला अंत:करणपूर्वक भजतात त्यांचे काहीही करण्यास मी लाजत नाही. ॥९-३४०॥

मग तींहीं जें जें करावें । तें मजचि पडिलें आघवें ।
जैसी अजातपक्षाचेनि जीवें । पक्षिणी जिये ॥ ९-३३९ ॥
मग जे जे म्हणून त्यांस करावयाचे असते ते ते सर्व मलाच करावे लागते. जसे पंख न फुटलेल्या पिलांच्या जीवित्वाने पक्षिण जगते, ॥९-३३९॥
चक्षु म्हणजे नेत्र हे ज्ञानाचे प्रतीक आहे आणि पंख हे पुरुषार्थाचे प्रतीक आहे. अनन्य भक्ताच्या सर्व गरजा भगवंत भागवतात.

मग अभिन्ना इया सेवा । चित्त मियांचि भरेल जेधवां ।
माझा प्रसादु जाण तेधवां । संपूर्ण जाहला ॥ १२६९ ॥
मग जेव्हा या अभिन्न सेवेने चित्तात मी भरून जाईन तेव्हा माझा प्रसाद पूर्ण झाला असे समज. ॥१८-१२६९॥

ज्ञानेश्वर महाराज म्हणतात जेव्हा अनन्य भावाने माझा भक्त माझ्यामध्ये चित्त एकाग्र करतो त्याचे चित्त परमात्म्याने भरून जाते. त्याला अंत:करणाची प्रसन्नता प्राप्त होते. 
या सृष्टीचे संचलन करण्यासाठी प्रकृतीच्या अनेक शक्ती आहेत. प्रत्येक शक्तीची वेगवेगळी अधिष्ठात्री देवता आहे. ज्याप्रमाणे सरकारमध्ये वेगवेगळी कामे करण्यासाठी वेगवेगळे विभाग असतात. प्रत्येक विभागाचा एक विभाग प्रमुख असतो. त्याचप्रमाणे हे आहे. उदाहरणार्थ वरूण देवता ही जलाची देवता आहे. लक्ष्मी समृद्धीची देवता आहे, गणेश विद्येची देवता आहे. परंतु ज्याप्रमाणे त्या सर्व विभाग प्रमुखांना मंजुरी देणारा पंतप्रधानांचा विभाग असतो, त्याप्रमाणे या सर्व देवतांना क्षमता देणारा परमात्माच असतो. परंतु हे न जाणल्यामुळे लोक विविध देवतांची उपासना करतात.

9.23

येऽप्यन्यदेवता भक्ता, यजन्ते श्रद्धयान्विताः।
तेऽपि मामेव कौन्तेय, यजन्त्यविधिपूर्वकम्।।9.23।।

हे अर्जुना! जे सकाम भक्त श्रद्धेने दुसर्‍या देवांची पूजा करतात, तेही माझीच पूजा करतात. परंतु त्यांचे ते पूजन अज्ञानपूर्वक असते.

काही सकाम श्रद्धा धरणारे भक्त काही प्राप्त करण्यासाठी भगवंतांची भक्ती करत असतात. सकाम भक्ती पूर्णतः अयोग्य नाही कारण भगवंत भक्ताच्या अभ्युदयाची पण पूर्ती करतात. परंतु येथे भगवंत आपल्या ज्ञानावर असलेले अज्ञानाचे आवरण दूर करू इच्छितात. आपण जर सकाम भक्ती करत असू तर आपल्याला ते माहीत असले पाहिजे. येथे भगवंत म्हणतात असे सकाम श्रद्धावान भक्त आपल्या इच्छापूर्तीसाठी विविध देवतांची भक्ती करतात. परंतु पर्यायाने ते माझीच भक्ती करत असतात. अज्ञानामुळे त्यांना ते समजत नाही. उदाहरणार्थ एखादी व्यक्ती विद्युत क्षेत्रातील एखाद्या विभागात काम करत असेल तर ती सेवा त्या विभागाची झाली, विद्युत क्षेत्राची झाली, राज्य सरकारची झाली, तसेच केंद्र सरकारची सुद्धा झाली. म्हणजेच कुठल्याही छोट्याशा विभागात सेवा देणारी, काम करणारी व्यक्ती सुद्धा पर्यायाने देशाची सेवा करत असते. परंतु अज्ञानामुळे त्या व्यक्तीला ते समजत नाही. अनेक भक्त भगवंताच्या विविध रूपांची भक्ती करत असतात. कधी कधी विष्णुंची भक्ती करणारे वैष्णव शंकरांना मानत नाहीत आणि शिवाची आराधना करणारे शैव विष्णुंना मानत नाहीत.

नरहरी सोनार पंढरपूरमध्ये राहत होते. ते शंकराची आराधना करत असत. ते अतिशय सुंदर दागिने बनवत असत. एकदा त्यांच्याकडे एक व्यक्ती आली. "जर मला संतानप्राप्ती झाली तर मी पांडुरंगासाठी एक सोन्याचा कंबरपट्टा बनवेन" असा नवस त्या व्यक्तीने बोलला होता. तो नवस त्या व्यक्तीला पूर्ण करावयाचा होता. त्यांना कोणीतरी नरहरी सोनारचे नाव सांगितले. ते नरहरी सोनाराकडे आले. नरहरी सोनार म्हणाले, "तुम्ही मला पांडुरंगाच्या कमरेचे माप आणून द्या. कारण मी त्या देवळात जाऊ शकत नाही. मी शैव आहे. मी पांडुरंगाला मानत नाही." त्याप्रमाणे याजमानांनी नरहरी सोनाराला कमरेचे माप आणून दिले आणि नरहरींनी अतिशय सुंदर असा रत्नजडित कंबरपट्टा पांडुरंगासाठी बनवला. यजमान अतिशय प्रसन्न झाले. पांडुरंगाला घालण्यासाठी जेव्हा ते कंबरपट्टा घेऊन गेले तेव्हा तो कंबरपट्टा अतिशय ढिला झाला. ते तो कंबरपट्टा घेऊन नरहरी सोनाराकडे आले आणि त्यांना तो कंबरपट्टा छोटा करण्यास सांगितला. नरहरींनी पट्टा छोटा करून दिला तेव्हा तो फारच छोटा झाला. असे तीन-चार वेळा झाले. शेवटी यजमान म्हणाले कृपया आपण स्वतः येऊन माप घ्यावे. परंतु नरहरी सोनार म्हणाले मी तर पांडुरंगाचे दर्शन घेऊ शकत नाही. मग शेवटी ते डोळ्याला पट्टी बांधून कमरेचे माप घेण्यासाठी मंदिरात गेले. ज्या क्षणी त्यांनी पांडुरंगाच्या कमरेला हात लावला त्यांना शंकराच्या पिंडीचा भास झाला. त्यांनी पटकन डोळ्याला बांधलेली पट्टी बाजूला सरकवली तर पांडुरंग आपल्या कटेवर कर ठेवून उभे होते. परत पट्टी बांधली आणि कमरेचे माप घेण्यास गेले तर परत शंकरांच्या पिंडीचा भास झाला. तेव्हा नरहरी सोनारांना कळले की त्यांच्या डोळ्यावरची अज्ञानाची पट्टी बांधली होती ती दूर करण्यासाठी भगवंतांनी ही लीला केली. 

9.24

अहं(म्) हि सर्वयज्ञानां(म्), भोक्ता च प्रभुरेव च।
न तु मामभिजानन्ति, तत्त्वेनातश्च्यवन्ति ते।।9.24।।

कारण सर्व यज्ञांचा भोक्ता आणि स्वामीही मीच आहे. पण ते मला तत्त्वतः जाणत नाहीत; म्हणून पुनर्जन्म घेतात.

येथे भगवंत अर्जुनाला म्हणतात की सर्व कार्यांचा भोक्ता आणि स्वामी मीच आहे कारण या सृष्टीचा नियंता संचालक मीच आहे. GOD म्हणजे Generator - Operator - Destroyer. सृष्टीचा रचयिता, पालनकर्ता आणि संहारकर्ता- ब्रह्मा, विष्णु आणि महेश सर्व काही मीच आहे असे भगवंत म्हणतात. परंतु हे न जाणल्यामुळे लोक अधोगतीस प्राप्त होतात. त्यांच्या मनामध्ये भ्रांती उत्पन्न होते. आपल्या घरातील विद्युत उर्जा, जनरेटर- 400KV सब स्टेशन- 132 KV सब स्टेशन- 33KV सब स्टेशन- ट्रान्सफॉर्मर- विद्युत खांब असा प्रवास करत आपल्या घरात येते. जसे जनरेटर पासून आपल्या घरापर्यंत विद्युत ऊर्जा प्रवास करत येते त्याचप्रमाणे त्या परमात्म्याची ऊर्जा आपण ज्याची उपासना करतो तेथून आपल्याला मिळते. परंतु केवळ तेच रूप योग्य आहे असे मानणे ही भ्रांती आहे, अज्ञान आहे. मूळ परमात्मा स्वरूप परब्रह्माला जाणणे ही आपल्याला गीतेची शिकवण आहे. 

9.25

यान्ति देवव्रता देवान्, पितॄन्यान्ति पितृव्रताः।
भूतानि यान्ति भूतेज्या, यान्ति मद्याजिनोऽपि माम्।।9.25।।

देवांची पूजा करणारे देवांना मिळतात. पितरांची पूजा करणारे पितरांना जाऊन मिळतात. भूतांची पूजा करणारे भूतांना प्राप्त होतात आणि माझी पूजा करणारे भक्त मला येऊन मिळतात. त्यामुळे माझ्या भक्तांना पुनर्जन्म नाही.

परमेश्वराची भक्ती करणारा भक्त हा जिथे त्याचा जन्म झाला असेल त्याप्रमाणे, तेथील संस्कारांप्रमाणे, भगवंताची भक्ती करतो. विविध देवतांची भक्ती करणारे लोक त्या देवतेकडून लौकिक यश, समृद्धी, संपत्ती, वरदान इत्यादी गोष्टी मिळवतात. जे पितरांची आराधना करतात त्यांनाही पितरांकडून वरदान शक्ती प्राप्त होते.
(पितर म्हणजे आपले पूर्वज - जे देह सोडून गेले आहेत परंतु चैतन्य रूपाने येथे आहेत. आपण श्राद्ध करून त्यांची आराधना करतो) 
पूर्वजांचे गुण आपोआपच पुढील पिढीत संक्रमित होतात. आपल्या पूर्वजांनी आपल्याला दिलेल्या गोष्टींच्या आधारे आपण आपले जीवन चांगल्या प्रकारे व्यतीत करू शकतो. 

आज मी आपल्यापुढे गीतेचे विवेचन करत आहे परंतु याच्यामागे माझे सासरे राष्ट्रपती पुरस्कार विजेते संस्कृत पंडित प्रज्ञाभारती श्री. श्री. भा. वर्णेकर यांनी केलेली आराधना आहे. घरातील त्या संस्कृतच्या लहरींमुळे मी हे गीतेचे ज्ञान आपल्यापुढे प्रवाहित करू शकत आहे. पितरांच्या कृपेमुळे हे असे शक्य होऊ शकते. भूतमात्रांची अर्चना करणारे तेथपर्यंत पोहोचू शकतात. भूत या शब्दाचे दोन अर्थ आहेत एक म्हणजे अतृप्त आत्मा आणि दुसरा म्हणजे पंचमहाभूतांपासून निर्माण झालेला. अतृप्त आत्म्यांची किंवा पंचभूतांपासून निर्माण झालेल्यांची आराधना करणारे सुद्धा तेथे पोहोचतात . भौतिक गोष्टींचे, तत्त्वांचे संशोधन करणारे शास्त्रज्ञ तेथपर्यंत पोहोचू शकतात. 

परंतु कुठल्याही दैवताची आराधना करत असताना ही परमात्म्याची आराधना आहे या वृत्तीने जे आराधना करतात, हा भाव मनात ठेवून जे आराधना करतात, ते मलाच येऊन मिळतात. 
येथे अर्जुनाच्या पुढे निश्चितच मोठा प्रश्न निर्माण झाला असेल की जेव्हा आपण परमेश्वराची आराधना, पूजा घरात करतो तेव्हा अनेक गोष्टींचा उपयोग करतो. परंतु मी तर युद्धभूमीवर आहे अशा प्रसंगी परमेश्वराची आराधना कशी करावी? याचे उत्तर भगवंत पुढील श्लोकात देतात.
   

9.26


पत्रं(म्) पुष्पं(म्) फलं(न्) तोयं(य्ँ), यो मे भक्त्या प्रयच्छति।
तदहं(म्) भक्त्युपहृतम्, अश्नामि प्रयतात्मनः॥9.26॥

जो कोणी भक्त मला प्रेमाने पान, फूल, फळ, पाणी इत्यादी अर्पण करतो, त्या शुद्ध बुद्धीच्या निष्काम प्रेमी भक्ताने अर्पण केलेले ते पान, फूल इत्यादी मी सगुण रूपाने प्रकट होऊन मोठ्या प्रीतीने खातो.

येथे भगवंत म्हणतात माझी अर्चना करण्यासाठी कुठल्याही विशेष गोष्टींची आवश्यकता नाही या सृष्टीत निर्माण झालेल्या कुठल्याही गोष्टीने माझी अर्चना होऊ शकते कारण या सर्व गोष्टी मीच निर्माण केले आहेत.
जो भक्त शुद्ध बुद्धीने, भक्तीने, प्रेमाने मला पान, फूल, फळ, पाणी इत्यादी अर्पण करतो मी ते ग्रहण करतो.

संत ज्ञानेश्वर म्हणतात,
पैं भक्ति एकी मी जाणें । तेथ सानें थोर न म्हणे ।
आम्ही भावाचे पाहुणे । भलतेया ॥ ३९५ ॥
मी एक भक्तीच ओळखतो. मग त्या ठिकाणी लहानथोर अशी निवड करीत नाही. आम्ही वाटेल त्याच्या भक्तिरूपी मेजवानीला पाहुणे म्हणून हजर असतो. ॥९-३९५॥
येर पत्र पुष्प फळ । हें भजावया मिस केवळ ।
वांचूनि आमुचा लाग निष्कळ । भक्तितत्त्व ॥ ३९६ ॥
बाकी पान, फूल, फळ यांचे अर्पण करणे, ते मला भजण्याचे एक निमित्त असते. वास्तविक पाहिले तर आम्हाला आवडते असे म्हटले म्हणजे भक्ताच्या ठिकाणचे शुद्ध भक्तितत्वच होय. ॥९-३९६॥

याच अध्यायात मागे म्हटले आहे,
अवजानन्ति मां मूढा मानुषीं तनुमाश्रितम्।
परं भावमजानन्तो मम भूतमहेश्वरम्।।९.११।
परमात्मा हा भावस्वरूप आहे परंतु बरेचसे लोक परमेश्वराचे हे भावस्वरूप जाणत नाहीत. मी या मनुष्य देहात असल्यामुळे काही जण मला मनुष्य स्वरूपच मानतात किंवा बाहेरच्या आकारालाच परमेश्वर मानून त्यातच अडकतात. भगवंताचा भाव जाणणे, त्याला भावाने, प्रेमाने अर्पण करणे महत्त्वाचे.

संत ज्ञानेश्वर हरिपाठात म्हणतात,
भावबळे आकळे एरव्ही नाकळे ।
करतळी आवळे जैसा हरि ॥ 

परमेश्वराला प्रसन्न करण्यासाठी ५६ भोग चढवण्याची आवश्यकता नसते परमेश्वराला तसे ५६ भोग चढवून जर सर्व ठिकाणी त्याची प्रसिद्धी केली तर फक्त अहंकार प्राप्त होतो. भगव़ताला यापैकी कशाचीही आवश्यकता नसते. जिथे अहंकार असतो तेथे भगवंत नसतात. 

कबीरजी म्हणतात,
जब मैं था तब हरि नहीं अब हरि है मैं नाहीं ।
प्रेम गली अति सांकरी जामें दो न समाहीं ॥
जोपर्यंत मनात अहंकार होता तोपर्यंत ईश्वराचा साक्षात्कार झाला नाही. जेव्हा अहंकार समाप्त झाला तेव्हा तो भेटला. प्रेमाच्या अरूंद गल्लीमधे एकच गोष्ट राहू शकते. अहम किंवा परम.

जे परमात्म्याने निर्माण केलेले आहे ते पत्र, पुष्प,फळ किंवा पाणी यापैकी काहीही अर्पण करून परमात्म्याची आराधना आपण करू शकतो. 

उत्तरा ही अभिमन्यूची पत्नी होती. ती गर्भवती होती आणि तिच्या गर्भात परीक्षित होता. महाभारत युद्धात अभिमन्यूचा मृत्यू झाला. महाभारत युद्धानंतर अश्वत्थाम्याने ब्रह्मास्त्र चालवले. हे अस्त्र परत घेण्याची विद्या त्याला माहीत नव्हती. मातेच्या गर्भात जाऊन त्या गर्भाचा ही नाश या ब्रह्मास्त्राने केला त्यामुळे उत्तरेच्या गर्भातील हालचाल थांबली. उत्तरा अतिशय दुःखी झाली तिने व्याकुळतेने श्रीकृष्णाची आराधना केली. पांडवांचा एकमेव अंश असलेला गर्भ सुद्धा नष्ट झाला होता तेव्हा भगवंतांनी उत्तरेला म्हटले, "मला काहीही अर्पण कर जे तुझ्याजवळ आहे." उत्तरा म्हणाली, "हे कृष्णा, माझ्याकडे आता काहीही उरले नाही. माझे पतीही माझ्याजवळ नाहीत." तेव्हा भगवंतांनी तिला तिचे मातृत्व अर्पण करावयास सांगितले. तिने ते केले आणि त्यानंतर भगवंतांनी तिच्या गर्भात जाऊन त्याचे रक्षण केले. द्रौपदी वस्त्रहरणाच्या वेळी सुद्धा द्रौपदी सर्वजणांना आश्रयासाठी विनंती करत होती. जेव्हा सर्व आश्रय संपले तेव्हा तिने भगवंतांची आळवणी केली. जेव्हा सर्व आश्रय संपतात तेव्हा भगवंत रक्षणासाठी येतात.
 
परंतु तरीही अर्जुनाच्या मनात प्रश्न होता कारण युद्धभूमीवर पत्र, पुष्प, फळ किंवा पाणी यापैकी काहीही अर्पण करणे शक्य नव्हते. संकटकाळी परमेश्वराची अर्चना करणे शक्य नसते अशावेळी काय करायचे याचे उत्तर भगवंत पुढील श्लोकात देतात.

9.27

यत्करोषि यदश्नासि, यज्जुहोषि ददासि यत्।
यत्तपस्यसि कौन्तेय, तत्कुरुष्व मदर्पणम्।।9.27।।

हे अर्जुना! तू जे कर्म करतोस, जे खातोस, जे हवन करतोस, जे दान करतोस आणि जे तप करतोस, ते सर्व मला अर्पण कर.

येथे भगवान अर्जुनाला म्हणतात की जे तू खातोस, जे कर्म करतोस, जे हवन करतोस, जे दान देतोस आणि जे तप करतोस ते मला अर्पण कर. 
खाताना सुद्धा भगवंताचे अनुसंधान सोडता कामा नये. 
दान अनेक प्रकारचे असते उदाहरणार्थ अन्नदान, वस्त्रदान, विद्यादान, वेळेचे ज्ञान.

सोळाव्या अध्यायात विविध प्रकारच्या तपांचे वर्णन केले आहे.
युधिष्ठिराने यक्षाच्या प्रश्नाला उत्तर देताना म्हंटले आहे
तपः स्वधर्मवर्तित्वं मनसो दमनं दमः ।
क्षमा द्वन्द्वसहिष्णुत्वं हीरकार्यनिवर्तनम्।।
अर्थात - आपल्या स्वधर्मानुसार प्राप्त कर्तव्य कर्माचे निष्ठेने पालन करणे ही तपस्याच आहे. मनाला काबूत ठेवणे हे दमन होय. सुख-दुःख, लाभ-हानी यांच्याप्रती समभाव राखणे क्षमा आहे तर वर्ज्य कार्य त्यागणे ही लज्जा होय.
स्वधर्माचे पालन करत असताना मनुष्याला कष्ट सहन करावे लागतात. कर्तव्य कर्म करत असताना कष्ट होतात. सेवा करत असतानाही कष्ट होतात. हे सर्व तपच आहेत. कर्म हेच आपले यज्ञ कर्म आहेत.

संत ज्ञानेश्वर म्हणतात,
स्वर्धमु जो बापा । तोचि नित्ययज्ञु जाण पां ।म्हणौनि वर्ततां तेथ पापा । संचारु नाहीं ॥ ३-८१॥
अरे अर्जुना, आपला जो स्वधर्म आहे, तो एखाद्या निरंतर चालणाऱ्या यज्ञासारखा आहे, त्यामुळे तो आचरताना पाप लागत नाही.॥३-८१ ॥
म्हणून येथे भगवंत म्हणतात ही सर्व कर्मे मला अर्पण करा.  किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धीस नेले आपली संपूर्ण ज्ञानेश्वरी सिद्ध झाल्यानंतर ते म्हणतात हे जे काही केले आहे ते केवळ सद्गुरू कृपेमुळेच झाले आहे. 
कार्य केल्यानंतर ते कार्य परमेश्वराच्या कृपेमुळेच झाले आहे हे लक्षात ठेवावे. कारण ते कार्य करण्यासाठी शक्ती मिळते तीही परमात्म्यानेच दिलेली असते. त्यामुळेच कुठलेही कार्य केल्यानंतर ते परमात्म्याला अर्पण करणे योग्य असते. 

या अध्यायात येथे भक्तियोग आणि कर्मयोग यांचा मिलाप झाला आहे. 
तेजोमयानंदजी यांनी अतिशय उत्तम गोष्ट सांगितली आहे. ते म्हणतात, "जर एखाद्याने आपल्याला हिऱ्याची अंगठी दिली तर आपण त्याचे आभार मानतो परंतु आपल्याला परमेश्वराचे सुद्धा आभार मानले पाहिजेत कारण ती अंगठी घालण्यासाठी दिलेले बोट हे परमात्म्यानेच दिलेले असते." 

म्हणून संत ज्ञानेश्वर म्हणतात केलेल्या कामावर कर्तृत्व आणि भोक्तृत्व याचे लेप चढतात ते आपण धुवून टाकले पाहिजेत. 
तें क्रियाजात आघवें । जें जैसें निपजेल स्वभावें ।
तें भावना करोनि करावें । माझिया मोहरा ॥ ४०० ॥
अर्थ -जे जे कर्म, जसे जसे तुझ्याकडून स्वभावत: घडेल (मग ते सांग असो अथवा असांग असो) ते सर्व कर्म माझ्या प्रीत्यर्थ आहे अशा समजुतीने कर. ॥९-४००॥

असे कर्म केल्यानंतर त्यापासून अलिप्त होणे आणि ते कर्मफल सुद्धा परमेश्वराचा प्रसाद म्हणून ग्रहण करणे म्हणजेच कर्मयोग.
हे अर्पण करताना कसे अर्पण करावे याबद्दल संत ज्ञानेश्वर म्हणतात,
परि सर्वथा आपुले जीवीं । केलियाची से कांहींचि नुरवीं ।
ऐसीं धुवोनि कर्में द्यावीं । माझियां हातीं ॥ ४०१ ॥
परंतु अमूक कर्म मी केले, अशी कर्तृत्वाची आठवण मुळीच आपल्या मनामधे ठेऊ नकोस. याप्रमाणे सर्व कर्मे शुद्ध करून (कर्तृत्व अभिमानरहित होऊन) मला अर्पण कर. ॥९-४०१॥
"मी केले" या भावनेचा लेप धुवून टाकला पाहिजे.
संत तुकाराम म्हणतात,
आपुलिया बळें नाहीं मी बोलत । सखा कृपावंत वाचा त्याची ॥१॥
साळुंकी मंजूळ बोलतसे वाणी । शिकविता धणी वेगळाची ॥ध्रु.॥
मी माझ्या सत्तेने बोलत नाही तर कृपावंत सखा असा हा पांडुरंग तोच माझ्या वाणीने बोलत आहे. साळुंकी मंजुळ शब्दात बोलते पण तिला शिकविणारा धनी वेगळाच असतो.
हे असे का करावे कारण जीवनात सर्व शुभ गोष्टीच घडत असतात असे नाही तर कधी कधी अशुभ गोष्टी ही घडत असतात उदाहरणार्थ युद्धामध्ये परिणामांची चिंता अर्जुनाला सतावत होती. सर्व कर्मे परमात्म्याला अर्पण करावीत.

9.28

शुभाशुभफलैरेवं(म्), मोक्ष्यसे कर्मबन्धनैः।
सन्न्यासयोगयुक्तात्मा, विमुक्तो मामुपैष्यसि।।9.28।।

अशा रीतीने ज्यामधे सर्व कर्मे मला भगवंताला अर्पण होतात, अशा संन्यासयोगाने मुक्त चित्त असलेला तू शुभाशुभफलरूप कर्म बंधनातून मुक्त होशील आणि मला येऊन मिळशील.

इथे भगवंत अर्जुनाला शुभ आणि अशुभ अशा दोन्ही प्रकारच्या कर्मांच्या बंधनातून मुक्त होण्यास सांगतात. कर्म बंधनातून मुक्त होणे म्हणजे कर्तुत्व, भोक्तृत्व आणि कर्मासक्ती याचा त्याग करणे. कर्तृत्व म्हणजे "मी केले" ही भावना. भोक्तृत्व म्हणजे केलेल्या कर्माचे फळ भोगण्याची इच्छा. कर्मासक्ती म्हणजे हे कर्म मीच करणार ही तीव्र इच्छा. ही सर्व कर्मांची बंधने आहेत. गुरु स्वामी सत्यमित्रानंदजी महाराज म्हणतात की श्रीकृष्णाने गीता सांगितली याचा मुख्य उद्देश अर्जुनाला कर्म बंधनातून मुक्त करणे हाच होता. 
या श्लोकात पुढे एक सुंदर शब्द वापरला आहे तो म्हणजे "संन्यास योग युक्तात्मा." संन्यास म्हणजे सर्वांचा त्याग करणे आणि योग म्हणजे जोडणे. जेव्हा आपण काहीतरी सोडतो तेव्हा कुठेतरी जोडले जाणे आवश्यक असते. परिवर्तनशील संसारापासून दूर जाणे त्याचा त्याग करणे आवश्यक आहे. परंतु जे अपरिवर्तनशील आत्मतत्त्व आहे त्याच्याशी जोडले गेले पाहिजे. भगवंत म्हणतात हे अर्जुना तू याप्रमाणे वागशील तर मलाच प्राप्त करशील. 

9.29

समोऽहं(म्) सर्वभूतेषु, न मे द्वेष्योऽस्ति न प्रियः।
ये भजन्ति तु मां(म्) भक्त्या, मयि ते तेषु चाप्यहम्।।29।।

मी सर्व प्राणिमात्रात समभावाने व्यापून राहिलो आहे. मला ना कोणी अप्रिय ना प्रिय. परंतु जे भक्त मला प्रेमाने भजतात, ते माझ्यात राहतात आणि मीही त्यांच्यात प्रत्यक्ष प्रकट असतो.

भगवंत म्हणतात जे तू प्राप्त करू इच्छितोस ते तू प्रथम जाणून घे. मी सर्वांसाठी समान आहे. ईश्वरस्य तू पर्जन्यवत् द्रष्टव्या:| ईश्वराला पावसाप्रमाणे मानले पाहिजे. आपण जे धान्य पेरू ते धान्य उगवते. भगवंत म्हणतात मी कोणाचाही द्वेष करत नाही पण माझ्यासाठी कोणी अतिशय प्रिय सुद्धा नाही. परंतु जे प्रेमपूर्वक माझी भक्ती करतात ते माझ्यामध्ये आणि मी त्यांच्यामध्ये वास्तव्य करतो. ज्याप्रमाणे सूर्याचा प्रकाश, चंद्राची शीतलता, पाण्याची शीतलता सर्वांसाठी समान असते त्याप्रमाणेच भगवंत सर्वांसाठी समान असतात. 

संत ज्ञानेश्वर म्हणतात,
तो मी पुससी कैसा । तरि जो सर्वभूतीं सदा सरिसा ।
जेथ आपपरु ऐसा । भागु नाहीं ॥ ४०७ ॥
भक्त ज्याचे स्वरूप बनतो तो मी कसा आहे म्हणून विचारशील तर सांगतो ऐक. जो मी सर्व प्राण्यांमधे सारखा व्यापून राहिलो आहे व जेथे आपला व परका असा भेद नाही, ॥९-४०७॥
भगवंत सर्वांसाठी समान असतात दुर्योधनाने १ औक्षोहिणी सेना मागितली ती भगवंतांनी त्याला दिली. अर्जुनाने भगवंतांना मागितले. ते त्याला मिळाले.

आदी शंकराचार्यांनी फार सुंदर दृष्टांत दिला आहे.
एखाद्या बर्फाळ थंड प्रदेशात जर कोणी अग्नि पेटवला चार-पाच जण त्याच्या भोवती बसले परंतु एक जण त्याच्यापासून लांब उभा राहिला आणि तो म्हणाला की अग्नी पक्षपाती आहे तो मला उष्णता देत नाही तर ते म्हणणे योग्य ठरणार नाही. त्याचप्रमाणे भगवान सर्वांसाठी समान आहेत ते पक्षपाती नाहीत.

9.30

अपि चेत्सुदुराचारो, भजते मामनन्यभाक्।
साधुरेव स मन्तव्यः(स्), सम्यग्व्यवसितो हि सः।।9.30।।

जर एखादा अत्यंत दुर्वर्तनीसुद्धा अनन्यभावाने माझा भक्त होऊन मला भजेल, तर तो सज्जनच समजावा. कारण तो यथार्थ निश्चयी असतो. अर्थात त्याने ईश्वरभजनासारखे दुसरे काहीही नाही, असा पूर्ण निश्चय केलेला असतो.

9.30 writeup

9.31

क्षिप्रं(म्) भवति धर्मात्मा, शश्वच्छान्तिं(न्) निगच्छति।
कौन्तेय प्रतिजानीहि, न मे भक्तः(फ्) प्रणश्यति।।9.31।।

तो तत्काळ धर्मात्मा होतो आणि नेहमी टिकणाऱ्या परम शांतीला प्राप्त होतो. हे अर्जुना! तू हे पक्के सत्य लक्षात ठेव की माझा भक्त नाश पावत नाही.

जो सिद्धांत इतरत्र कोठेही आला नाही तो येथे आला आहे. येथे भगवान म्हणतात जो दुराचारी आहे, पापी आहे आणि जो अनन्य भावाने मला शरण आला आहे तसेच जर त्याने यथार्थपणे निश्चय केला असेल की ही माझी दुष्कृत्ये, पापे नष्ट झाली पाहिजेत तर तो सज्जनच समजावा. रत्नाकर डाकू नारद मुनींच्या उपदेशाने बदलले आणि वाल्मिकी ऋषी झाले. ज्याप्रमाणे कित्येक कोटी रामनामाचा जप केल्यानंतर त्याचे सर्व पाप नष्ट झाले त्याप्रमाणे पापी मनुष्य जर त्याने केलेल्या पापांपासून मुक्त होण्याची मनापासून इच्छा करत असेल तर तो सज्जन ठरतो. भगवद्गीतेमध्ये काही गोष्टींची पुनरावृत्ती अनेक ठिकाणी झाली आहे. परंतु येथे सांगितला सिद्धांत मात्र इतरत्र कोठे सांगितलेला नाही. अतिशय पापी मनुष्य सुद्धा परमात्म्याची प्राप्ती करू शकतो. पापी मनुष्याला सुद्धा आत्मोन्नती करण्याचा अधिकार असतो.

संत ज्ञानेश्वर येथे म्हणतात, 
यालागीं दुष्कृती जर्‍ही जाहला । तरी अनुतापतीर्थीं न्हाला ।
न्हाऊनि मजआंतु आला । सर्वभावें ॥ ४२० ॥
अर्थ- याकरता पूर्वीचा दुराचरण करणारा जरी असला तरी नंतर त्याविषयीच्या पश्चात्तापरूपी तीर्थात त्याने स्नान केले आणि अशा प्रकारचे स्नान करून सर्व भावांनी तो माझ्या ठिकाणी अनन्य झाला ॥९-४२०॥

भगवंत पुढे म्हणतात असा पश्चात्तापदग्ध मनुष्य लगेच धर्मात्मा बनतो. 
ज्ञानी मनुष्य भगवंता जवळ हळूहळू पोहोचतो.

सातव्या अध्यायात भगवंत म्हणतात 

बहूनां जन्मनामन्ते ज्ञानवान्मां प्रपद्यते |
वासुदेव: सर्वमिति स महात्मा सुदुर्लभ: || 7.19||

योगी सुद्धा अनेक जन्मांच्या सिद्धी नंतर भगवंताजवळ पोहोचतो.

भगवंत पुढे म्हणतात, "हे अर्जुना, मी शपथ पूर्वक सांगतो की माझ्या भक्ताचे कधीही पतन होत नाही किंवा मी त्याला कधीही दूर करत नाही."
एखाद्या आईला दोन मुले असतात परंतु त्यापैकी जो सतत आजारी असतो त्याची तिला सतत चिंता असते आणि त्याची ती सर्वात जास्त काळजी घेते त्याप्रमाणेच येथे भगवंत त्या मातेच्या भूमिकेत आहेत. 

9.32

मां(म्) हि पार्थ व्यपाश्रित्य, येऽपि स्युः(फ्) पापयोनयः।
स्त्रियो वैश्यास्तथा शूद्रा:(स्), तेऽपि यान्ति परां(ङ्) गतिम्।।9.32।।

हे अर्जुना! स्त्रिया, वैश्य, शूद्र तसेच पापयोनी अर्थात चाण्डालादी कोणीही असो, तेसुद्धा मला शरण आले असता परम गतीलाच प्राप्त होतात.

येथे भगवंत म्हणतात की स्त्रिया, वैश्य, शूद्र तसेच पापयोनी असे कोणीही असले तरी जर ते मला शरण आले तर ते परमगती प्राप्त करतात. सृष्टीच्या चलनवलनासाठी स्त्रिया, वैश्य आणि शूद्र हे फार महत्त्वाचे आहेत. परंतु ते आपल्या दैनंदिन व्यवहारात अतिशय व्यस्त असतात. परंतु ते जर मला शरण आले आणि माझी भक्ती करू लागले तर ते मला प्राप्त करतात.

9.33

किं(म्) पुनर्ब्राह्मणाः(फ्) पुण्या, भक्ता राजर्षयस्तथा।
अनित्यमसुखं(म्) लोकम्, इमं(म्) प्राप्य भजस्व माम्।।9.33।।

मग पुण्यशील ब्राह्मण तसेच राजर्षी भक्तलोक मला शरण येऊन परम गतीला प्राप्त होतात, हे काय सांगावयास पाहिजे? म्हणून तू सुखरहित व नाशवंत या मनुष्यशरीराला प्राप्त होऊन नेहमी माझेच भजन कर.

भगवंत म्हणतात पुण्यवान ब्राह्मण, सत्वगुणी, ज्ञान प्रधान लोक तसेच कर्मप्रधान रजोगुण भक्त मला शरण येऊन परमगतीला निश्चितच प्राप्त करतात. अर्जुनाला म्हणतात म्हणून या परिवर्तनशील आणि नाशवंत अशा मनुष्य शरीराला प्राप्त करून तू नेहमी माझे भजन कर. 

9.34

मन्मना भव मद्भक्तो, मद्याजी मां(न्) नमस्कुरु।
मामेवैष्यसि युक्त्वैवम्, आत्मानं(म्) मत्परायणः।।9.34।।

माझ्यात मन ठेव. माझा भक्त हो. माझी पूजा कर. मला नमस्कार कर. अशारीतीने आत्म्याला माझ्याशी जोडून मत्परायण होऊन तू मलाच प्राप्त होशील.

येथे भगवंत अर्जुनाला भक्ती कशी करायची आहे त्याबद्दल सांगतात ते म्हणतात तू मला तुझे मन अर्पण कर. प्रेमाने आणि भक्तीने माझ्याशी जोडलेले राहा. माझी पूजा कर. मला नमस्कार कर. मला शरण ये. परमात्मा आपल्या आयुष्याच्या केंद्रस्थानी असला पाहिजे असे भगवंत म्हणतात. असे केल्यास तू मलाच प्राप्त करशील असे भगवंत अभिवचन देतात. 
भगवद्गीता वाचत असताना आपल्याला अभ्युदय करायचा आहे त्याच प्रमाणे नि:श्रेयसही प्राप्त करावयाचे आहे. भौतिक प्रगती करायची आहे तसेच अंतिम कल्याणही साधायचे आहे. यासाठी भगवंताशी प्रेमाने आणि भक्तीने जोडले राहणे आवश्यक आहे.
गुरुदेवांना आणि ज्ञानदेवांना वंदन करून विवेचन सत्र समाप्त झाले. 

प्रश्नोत्तरे -
सुनील भैया
विशिष्ट देवतांना विशिष्ट प्रकारची पाने किंवा फुले अर्पण करावी असे काही नियम आहेत ते योग्य आहेत का?
नियम हे शास्त्राच्या आधारानेच बनवलेले आहेत परंतु जर आपला भाव योग्य आणि शुद्ध असेल तर त्याबाबतीत फार काटेकोर राहिले नाही तरी चालते. पूजन आणि भक्ती या दोन गोष्टींमध्ये अंतर आहे.
संत ज्ञानेश्वर म्हणतात,
तो करी तेतुली पूजा । तो कल्पी तो जपु माझा ।
तो असे तेचि कपिध्वजा । समाधी माझी ॥ ११८१ ॥
अर्जुना, तो जी कर्मे करील, ती माझी पूजा होय, तो जी कल्पना करील तो माझा जप होय आणि तो ज्या स्थितीत असेल, ती माझी समाधिअवस्था होय. ॥१८-११८१॥

परंतु त्यासाठी अंतकरण निर्मल असले पाहिजे. पाप पुण्याच्या कल्पना यासोबत जोडू नये. 
उदाहरणार्थ बिल्व दलाची तीन पाने किंवा दूर्वांची तीन दले हे स्वर्ग मृत्यू आणि पाताळ या तीन लोकांचे प्रतीक आहे किंवा आधिभौतिक, आधिदैविक आणि अध्यात्मिक या तीन दुःखांचे प्रतीक आहे. किंवा सत्व,रज,तम अशा तीन गुणांचे ते प्रतीक आहे. याचा अर्थ असा नाही की आपण जर चुकून दूर्वांची दोन दले गणपतीला वाहिली तर गणपती नाराज होतील. अशा विचारांपासून मुक्ती मिळवण्यासाठीच गीतेचा अभ्यास करायचा आहे. या पाप पुण्याच्या कल्पनांमध्ये आपण फार अडकून गेलो आहे. खरे तर दुसऱ्याला कष्ट देणे म्हणजे पाप आणि कोणासाठी काहीतरी चांगले काम करणे म्हणजे पुण्य होय. 

समापन प्रार्थनेने कार्यक्रमाची सांगता झाली.

ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां(य्ँ) योगशास्त्रे
श्रीकृष्णार्जुनसंवादे राजविद्याराजगुह्ययोगो नाम नवमोऽध्याय:।।


Thursday 19 October 2023

मन(mind)म्हणजे काय!!!!मनाची तुमची व्याख्या काय आहे???

गाभा: 

मन (mind)म्हणजे काय याचा उहापोह गेली अनेक शतके चालू आहे.सुरवातीला तत्वज्ञानाचा प्रांत असलेला मनाचा अभ्यास आता न्युरोसायन्सच्या प्रगतीमुळे विज्ञानाचाही प्रांत झाला आहे.ज्याला आपण मन किंवा mind म्हणतो त्याला शास्त्रीय भाषेत जाणीव किंवा consciousness असे म्हण्टले जाते.वेगवेगळ्या धर्मांमध्ये मनाची व्याख्या केली गेली आहे.हिंदू धर्मामध्ये आत्मा ही संकल्पना आहे.प्रत्येक जीवामध्ये अभौतिक (immaterial essence)स्वरुपात आत्मा नावाची गोष्ट असते असे हिंदू धर्म मानतो.बाकीच्या धर्मातही कमीअधिक प्रमाणात अशीच व्याख्या केली गेली आहे.
सतराव्या शतकात फ्रेन्च तत्वज्ञानी रेने देकार्त याने प्रथम याविषयाची सुसंगत मांडणी केली.ज्याला आज mind body problem असे म्हण्टले जाते.देकार्त हा द्वैतवादी होता.म्हणजे मन आणि शरीर या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत असे त्याचे म्हणने होते.विज्ञानाकडे जाणीवेचे (consciousness)कोणतेही स्पष्टिकरण नसल्याने या विषयाला अनेक शतके हात घातला गेला नाही .विसाव्या शतकात वर्तणूकशास्त्राचा(behaviorism) विज्ञानावर पगडा होता.पण यातून मनाचा कोणताच थांग लागत नव्हता.पुढे न्युरोसायन्सचा व आधुनिक इमेजिंग टेक्नॉलॉजीचा जन्म झाल्यानंतर मेंदूचा सखोल अभ्यास झाला.वेगवेगळे विचार ,भावना ,हरकती मेंदूत कुठे उगम पावतात याची सखोल माहीती मिळाली.याला neural correlates of consciousness असे म्हणतात.पण यात एक गंमत आहे.correlation is not explaination ह्या नुसार फक्त कारण शोधुन उपयोग नाही तर मानवी मनाचे पुर्ण विस्तृत असे विवरण दिले गेले पाहीजे.यात न्युरोसायन्स अपयशी ठरले आहे.

Hard problem of consciousness.--
ऑस्ट्रेलीयन फिलॉसॉफर डेव्हीड चामर्स यांनी आधुनीक काळात या विषयात खुप मोठे योगदान दिले आहे.१९९६ साली अमेरिकेत centre for consciousness studies इथे प्रथमच भरलेल्या कॉन्फरन्स मध्ये त्यांनी hard problem of consciousness ही संकल्पना मांडली.
काय आहे हार्ड प्रॉब्लेम?
एखादा व्यक्ती निरभ्र निळ्या आकाशाकडे पहात आहे.भौतिक अनुषंगाने याचे स्पष्टीकरण करता येईल.ठराविक तरंग लांबीच्या प्रकाशलहरी त्याव्यक्तीच्या दृष्टीपटलावर(retina) आदळतात.त्याच्या दृष्टीपटलाकडून विद्युत संकेत मेंदूकडे पाठवले जातात.त्याच्या मेंदूतील दृष्टीकेंद्रात(visual cortex) चेतापेशींचे संभाषण होते(neuronal activity) व त्याला निळ्या रंगाचे आकलन होते.यात भौतिक(materialist) अनुषंगाने सगळी प्रक्रीया जरी मापली गेली तरी त्यात "निळा रंग'' कुठेच सापडणार नाही.निळ्या रंगाची अनुभुती हा त्या व्यक्तीचा अत्यंत खाजगी अनुभव आहे.हा अनुभव नक्की कोण घेतो हे अजुनही ज्ञात नाही.देह अनुभव घेतो असे मानले तर तो अनुभव भौतिकवादातून स्पष्ट करता आला पाहीजे.तसे अजुनही स्पष्ट करता आलेले नाही.याला इंग्रजीत first person subjective experience असे म्हणतात व या वेगवेगळ्या अनुभुतींना qualia असे संबोधन आहे.हेच स्पर्श,चव,आवाजाची अनुभुती,विविध भावना याबाबतीतही सत्य आहे.मेंदुत घडणार्या या प्रक्रीया आपल्याला रंगाची,आवाजाची ,चवीची ,भावनेची अनुभुती का देतात हा आजच्या न्युरोसायन्स समोरचा एकमेव महत्वाचा असा प्रश्न आहे.यालाच हार्ड प्रॉब्लेम असे म्हणतात.


डेव्हीड चामर्स यांच्या म्हणन्यानुसार कूठलही भौतिक विज्ञान आपल्याला consciousness अर्थात जाणिवेचे उत्तर देऊ शकत नाही.चामर्स यांच्या मांडणीनुसार जाणीव( consciousness)ही अवकाश ,काळ याप्रमाणेच विश्वात मुलभुत स्वरुपात आहे.याला panpsychism असे म्हणतात.यानुसार अगदी मुलभुत कणांनाही जाणिव असते(miniscule consciousness).एकदंर संपुर्ण विश्व जाणीवेने भरलेले आहे.तुम्ही हातात घेतलेला मोबाईल वा तुमच्या समोरचा काँम्प्युटरही काही प्रमाणात conscious आहे.अर्थात extraordinary claims requires extraordinary proof नुसार अजुनहि याविषयी खात्रीशीर माहीती उपलब्ध नाही.
याचा अर्थ विज्ञानाने याकडे पाठ फिरवावी असे नव्हे.अमेरिकन भुलतज्ञ स्टुर्ट हॅमेरॉफ व नोबेलविजेते रॉजर पेनरोज यांनी quantum mind हा सिद्धांत मांड्ला आहे.त्यानुसार मन म्हणजे दुसरे तिसरे काही नसुन मेंदूत पुंजपातळीवर एकत्रीत साठवलेली माहीती आहे(information stored at quantum level).
इटालीयन अमेरिकन न्युरोसायंटीस्ट ग्युलिओ टोनोनी यांनी मनाची व्याख्या करताना integrated information theory मांडली आहे.सध्याची विज्ञान जगतात फार गंभिर दखल घेतलेली ही थेअरी आहे.
व्यक्तीगत मला डेव्हीड चामर्स यांचा ॲप्रोच योग्य वाटत असल्याने त्याविषयी विस्तृत लिहीले आहे.
बाकी तुमची मन म्हणजे काय याविषयीची मते जाणुन घ्यायला आवडेल.
१.मनाची तुमची व्याख्या काय आहे?
२.आत्मा (soul)ही संकल्पना तुम्हाला योग्य वाटते काय?
३.हार्ड प्रॉब्लेमचे तुमचे एक्सप्लेनेश काय आहे?
४.mind body problem सुटेल असे तुम्हाला वाटते काय?